कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या पाठपुराव्याला यश; शिक्षण अधिकारी बुगे यांनी काढले पत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- साफसफाई व आरोग्यास धोकादायी क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी याबाबत अंमलबजावणी करण्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच नगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतचे मुख्य अधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांना पत्र काढले आहे.
खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, रस्त्याने कचरा गोळा करणाऱ्या कामगारांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तरी सर्व कचरा वेचकांच्या पालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी केले आहे.
भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेत केंद्र सरकारच्या सुधारणीत अंमलबजावणीमध्ये कागद काच पत्रा गोळा करणाऱ्यांच्या पाल्यांचा ही समावेश केंद्र सरकारने केलेला आहे. अनुदानाचा लाभ सन 2022 पासून लागू झालेला आहे. वस्तीगृहात न राहणाऱ्या मुला-मुलींना वार्षिक अनुदान रक्कम 3500 रुपये तर वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक अनुदान 8000 रुपये लाभ देण्यात येतो. अपंग विद्यार्थ्यांना दहा टक्के अधिक भत्ता मिळतो. मात्र शहरासह जिल्ह्यातील कचरा वेचकांची मुले या योजनेपासून वंचित असल्याने कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या कष्टकऱ्यांच्या पालकांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याने खासदार लंके यांचे देखील लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत खासदार लंके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निवेदन देऊन संबंधित विभागांना या योजनेचा लाभ लाभार्थींना देण्याबाबत आदेशित करण्याची मागणी केली होती. लंके यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यानंतर शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी संबंधितांना पत्र काढून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रवृत्त करावे व या कार्यवाहीचा अहवाल समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करण्याचे म्हंटले आहे.
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज नोंदणी करावे. महाडीबीटी प्रणालीद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. अशा सरकारी योजनेतून गोरगरिबांचा आर्थिक पत उंचावणार असून, दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी व त्यांचा विकास होण्यासाठी उपयोग होणार आहे. साफसफाई व आरोग्यात धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे सूचित करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. -विकास उडाणशिवे (जिल्हा समन्वयक, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत समिती)