• Sun. Mar 16th, 2025

सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

ByMirror

Aug 25, 2023

वैजुबाभूळगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य देणार सामुदायिक राजीनामे

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय वादातून लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी वैजुबाभूळगाव (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर शुक्रवारी (दि.25 ऑगस्ट) उपोषण करण्यात आले. या उपोषणात सरपंच ज्योती घोरपडे, उपसरपंच रावसाहेब लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गुंजाळ, लता गुंजाळ, शकुंतला गुंजाळ, संगीता लोहकरे, नामदेव नरवडे, सुरज गुंजाळ, अमोल फुलशेटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला.


वैजुबाभूळगाव (ता. पाथर्डी) येथील सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर 22 जुलै रोजी राजकीय वादातून गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यातील आरोपी असलेले बाळासाहेब घोरपडे, ज्ञानेश्‍वर घोरपडे, साईनाथ घोरपडे, अंबादास घोरपडे, उत्तम घोरपडे, नितीन घोरपडे, सुशील घोरपडे, गणेश घोरपडे यांच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अथवा अटक करण्यात आलेली नाही. यामधील आरोपी मोकाट फिरत असल्याने गावाची शांतता धोक्यात आली आहे. गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, सरपंच, त्यांचे कुटुंबीय व सर्वसामान्य ग्रामस्थांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


आरोपीकडून पीडित कुटुंबातील लहान मुलांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्याची देखील निष्पक्षपाती चौकशी व्हावी व लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करुन अटक करण्याची मागणी वैजुबाभूळगाव ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *