खाकी वर्दीतील नवदुर्गांचा गौरव
लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महिला जेव्हा पुढे येतात, तेव्हा त्या नवदुर्गा ठरतात – पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख आणि भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांचा नवदुर्गा सन्मानाने गौरव करण्यात आला.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान पार पडला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी दोन्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, आज समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तमपणे कार्य करत आहेत. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि पोलीस दलातही त्या धैर्याने योगदान देत आहेत. पोलीस दलात काम करणे म्हणजे केवळ गुन्ह्यांशी लढा नव्हे, तर सामाजिक शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांचा विश्वास जपणे होय. खाकी वर्दी परिधान करून लोकांच्या सुरक्षिततेसाठी, न्याय मिळवून देण्यासाठी, आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जेव्हा महिला पुढे येतात, तेव्हा त्या केवळ अधिकारी राहत नाहीत, तर त्या समाजासाठी नवदुर्गा ठरतात. उंबरहंडे-देशमुख आणि आठरे या दोन्ही अधिकारी हे कर्तव्य जबाबदारीने निभावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पल्लवी उंबरहंडे-देशमुख व प्रियंका आठरे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, आम्ही रोजच्या कार्यात नागरिकांसाठी तत्पर असतो. कधी धोका, कधी दडपण, कधी भावनिक प्रसंग तरीही खाकी वर्दी म्हणजे जनतेच्या सुरक्षेचे व सेवेचे प्रतीक आहे. कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न ठेवता आम्ही कर्तव्य करत राहतो, पण अशा सन्मानाने आनखी चांगले काम करण्यास बळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
