मानवता हाच धर्म सर्वांनी आचरणात आणल्यास जगातील सर्व प्रश्न सुटू शकतील -पोपट पवार
नगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकांना आधार दिलेल्या व सातत्याने आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करणाऱ्या मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे पद्मश्री पोपट पवार यांनी कौतुक केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी पवार यांना संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या कार्याची माहिती पुस्तिका भेट देऊन, भविष्यातील विविध प्रकल्पाची माहिती दिली.
पद्मश्री पोपट पवार म्हणाले की, मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानने कोरोना काळात केलेले कार्य दिशादर्शक आहे. संस्थेच्या वतीने उत्तपणे सुरु असलेले कार्य सर्वसामान्यांना आधार देणारे आहे. मानवता धर्माने प्रेरित होऊन सर्वधर्मसमभाव या भावनेने योगदान सुरु आहे. मानवता हाच धर्म सर्वांनी आचरणात आणल्यास जगातील सर्व प्रश्न सुटू शकतील, असे त्यांनी सांगितले.
अल्ताफ सय्यद यांनी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू घटकातील आधार देण्याचे कार्य सुरु आहे. समाजातील विधवा महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनाने व निराधार बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था योगदान देत आहे. समाजात जातीय द्वेष पसरत असताना मानवता हाच एक धर्म समजून सेवा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
