• Tue. Oct 14th, 2025

पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत

ByMirror

Oct 9, 2025

डॉ. बंग यांचा व्याख्यानातून निरोगी जगण्याचा कानमंत्र


फूड उद्योगांच्या जाहिरातींच्या आक्रमणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात -डॉ. बंग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात जनआरोग्य चळवळीचे प्रणेते, पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. धनंजय वारे, डॉ. महेश जरे व पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, एस. डी. ए. संस्थेचे अरुण जगताप, डेव्हीड अवचित्ते, सुभाष आल्हाट यांनी त्यांचा सत्कार केला.


आरोग्य सदन हॉस्पिटल च्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. अभय बंग शहरात आले होते. यावेळी त्यांनी जगावं कशासाठी आणि कसं? या अत्यंत अर्थपूर्ण विषयावर व्याख्यान दिले. त्यांच्या विचारमंथनाने उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.


आज जगभरातील दारू, सिगारेट आणि प्रोसेस्ड फूड उद्योगांच्या जाहिरातींच्या आक्रमणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा गंभीर इशारा पद्मश्री डॉ. प्रशांत बंग यांनी दिला. त्या आकर्षक जाहिराती आरोग्यदायी जीवनशैलीपासून माणसाला दूर नेत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, या तथाकथित आधुनिक सवयींमुळे हृदयविकार, मधुमेह, स्थूलता आणि मानसिक तणाव यांसारखे आजार झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट केले.


डॉ. बंग पुढे म्हणाले की, आरोग्य ही फक्त आजार नसण्याची अवस्था नाही. स्वस्थ, अस्वस्थ आणि स्वतःमध्ये स्वस्थ हीच खरी आरोग्याची व्याख्या आहे. जेव्हा माणूस स्वतःशी, समाजाशी आणि निसर्गाशी संतुलन साधतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने निरोगी ठरतो. खरी आरोग्यक्रांती औषधांनी नाही, तर सजगतेने आणि जीवनशैलीतील बदलांनी घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश थोरात यांनी आरोग्य क्षेत्रात व्यावसायिकपणा निर्माण झाल्याने सर्वसामान्यांची अनेक ठिकाणी आर्थिक लूट होते. मात्र काही चांगले डॉक्टर आजही सेवाभावाने योगदान देत आहे. डॉ. बंग यांच्यामुळे आरोग्याबद्दल सामाजिक जागृती होत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *