शिक्षकांचा सन्मान करुन विद्यार्थ्यांनी केली कृतज्ञता व्यक्त
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर एक दिवसाचे शालेय कामकाज पाहून विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रंथपाल व सेवकाची भूमिका बजावली.

स्कूलचे प्राचार्य हारुन खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्या फरहाना शेख यांच्यासह सर्व शालेय शिक्षक उपस्थित होते.
हारुन खान म्हणाले की, शिक्षक हा भावी पिढीमध्ये संस्कार व सामाजिक मुल्य जिवंत ठेवणारा प्रवाह आहे. शिक्षक मुलांमध्ये सर्जनशिलता, कल्पकता, आत्मविश्वास, विवेक व चिकित्सकता निर्माण करुन समाज घडवित आहे. चार भिंतीच्या आत पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जगात भरारी घेण्यासाठी पंखात ज्ञानरुपी बळ देण्याचे कामही शिक्षकच करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपप्राचार्या फरहाना शेख यांनी शिक्षकांच्या पेरणीवरच भारताचे उज्वल भवितव्य घडत आहे. शिक्षक हाच समाजाचा आधारवड असल्याचे सांगून त्यांनी गुरुंप्रती आदर व निष्ठा ठेवण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी जीवनात शिक्षकांची महत्त्व सांगणारे भाषणे सादर केली. नाटीकेतून समाज घडविणाऱ्या शिक्षकाची महती सांगितली. तर शिक्षकांवर गीत देखील सादर केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, संस्थेचे खजिनदार डॉ. खालिद शेख, उपाध्यक्ष इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
