मंजूरी मिळूनही एक महिन्यापासून काम रखडले
अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना सहन करावी लागते अमानवीय परिस्थिती
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था ही ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. पावसाळ्यात अंत्यविधी करण्यास गंभीर अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन 14 लाख रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर काढून कार्यरंभाचे आदेश दिले आहे. ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे एक महिना उलटूनही काम सुरु करण्यात आलेले नाही. येत्या सात दिवसात काम सुरू न झाल्यास बोरुडे यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
स्मशानभूमीतील पत्र्याचा शेड पूर्णतः जीर्ण झाल्याने पावसाळ्यात अंतिम संस्कार करणे अशक्य झाले आहे. अनेकदा अंत्ययात्रेला ग्रामपंचायतसमोरील मंडपात थांबावे लागते आणि पाऊस थांबल्यावरच अंत्यविधीची प्रक्रिया करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शेडसह स्मशानभूमीत बसण्याची व्यवस्था नाही, रात्री प्रकाश नसल्याने आणखी अडचणी निर्माण होतात. अशा दुःखद प्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या वतीने बोरुडे यांनी स्मशानभूमीत पत्र्याचे शेड उभारणे, योग्य प्रकाशव्यवस्था करणे, दशक्रियेसाठी ओटे व शेड उभारणे, गेट व परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची मागणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व कार्यकारी अभियंता घोरपडे यांनी तांत्रिक मंजूरी देऊन 14 लाख रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर काढले आहे. मात्र, ग्रामपंचायतीने काम श्रेयाच्या राजकारणात अडकवून विलंब केला आहे.
स्मशानभूमीची झालेली दुरावस्था हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. बाकीची कामे बाजूला ठेवून हे काम तातडीने मार्गी लावले पाहिजे. पावसाळ्यात अंत्यविधी करणे अशक्य झाले आहे. वर्क ऑर्डर निघूनही काम सुरू न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोको आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. -जालिंदर बोरुडे (सामाजिक कार्यकर्ते)
