• Sat. Nov 1st, 2025

अन्यथा स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

ByMirror

Aug 15, 2024

चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध

समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणाऱ्या जातीयवादी शब्दांचा करण्यात आलेल्या उल्लेखाचा चर्मकार विकास संघाच्या वतीने निषेध नोंदवून संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवून जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांनी दिला आहे.


महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धा 13 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पार पडली. यामध्ये चर्मकार समाजाच्या हेतूपुरस्कर भावना दुखावण्यासाठी काही जातीयवादी अधिकारी यांनी बाल चित्रकला स्पर्धेतील विषयामध्ये चर्मकार समाजाच्या भावना दुखावणारे व त्यांना निकृष्ट लेखण्याचे शब्द वापरण्यात आले आहे.

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सामाजिक सलोखा निर्माण व्हावा व दलित तसेच इतर जातीयवादी शब्दाने असणाऱ्या वाड्या वस्त्यांचे नाव बदलून नव्याने महापुरुषांचे नावे देण्यात आली आहे. अशाप्रकारे एकीकडे सामाजिक सलोख्याचे कार्य करीत असताना शासनाच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शिक्षणातच जातीचे विष पेरण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देखील निवेदन पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *