तंदुरुस्तीमधून आरोग्य प्राप्तीसाठी विविध उपक्रम व शिबिराचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आणि अहिल्यानगर अस्थिरोग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, 1 मे रोजी एमओए डे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीची थीम फिटनेस म्हणजेच तंदुरुस्ती अशी असून ब्रीदवाक्य वेलनेस थ्रो फिटनेस (तंदुरुस्तीमधून आरोग्य प्राप्ती) ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. संपत ढुमरे व राज्याचे सचिव डॉ. अभिजीत वाहेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र एमओए डे साजरा होत आहे. या अनुषंगाने अहिल्यानगर अस्थिरोग संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हाडांचे आरोग्य, संधिवात, हाडांचा ठिसूळपणा यासारख्या आजारांविषयी जनजागृती आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
1 मे रोजी शहरातील जवळजवळ सर्व अस्थिरोग तज्ज्ञांच्या हॉस्पिटल्समध्ये सवलतीच्या दरात तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे, 1 मे ते 4 मे या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी, संधिवात तपासणी आणि फिजिओथेरपी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सरकारी कार्यालये आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी खास शिबिरे घेण्यात येणार असून त्यांना कामाचे स्वरूप आणि तणावामुळे होणाऱ्या अस्थिसंस्थेच्या तक्रारींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना लिगामेंट इंजुरी, स्नायूंच्या दुखापती, आणि फिटनेससंदर्भात तज्ज्ञांकडून सल्ला व उपचार मिळणार आहेत. त्यामुळे युवा वर्गासाठीही एमओए डे हा उपयुक्त ठरणार आहे. शहरात अशा प्रकारचे विविध उपक्रम अस्थिरोग संघटनेत मार्फत केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्य व मो डे चे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.
1 मे रोजी सकाळी 7:30 ते 10:00 या वेळेत साईनगर व विनायक नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक भवन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. राहुल पंडित, डॉ. महेश वीर व डॉ. अखिल धानोरकर हे रुग्णांची तपासणी करतील. या कार्यक्रमासाठी माजी उपमहापौर गणेश भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉ. राहुल पंडित, डॉ. महेश वीर व डॉ. अखिल धानोरकर हे रुग्णांना तपासणार आहे. सर्वांनी विविध शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर अस्थिरोग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.