शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा
नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानतर्फे खुल्या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत गायकांना सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आबिद हुसेन यांनी केले आहे.
रसिकश्रोत्यांसाठी हा कार्यक्रम विनाशुल्क असून, त्यांना देखील या संगीत व गायन कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. स्पर्धेत 18 वर्षे व त्यापेक्षा वयाने मोठ्या कोणत्याही व्यक्तीला सहभागी होण्याची संधी आहे. स्पर्धकांना सन 1970 ते 2000 या कालखंडातील सुपरहिट हिंदी फिल्मी गाणी गायची आहेत. गायकाने स्वतःचा ट्रॅक आणावा आणि त्यावर गायन सादर करायचं आहे. गाण्याची निवड, शब्द उच्चारण, स्वर, ताल, लय आणि श्रोत्यांचा प्रतिसाद या सर्व बाबींचा विचार करून परीक्षक विजेते ठरवणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम विजेत्याला 3 हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व द्वितीय विजेत्याला 2 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तसंच तृतीय विजेत्याला 1 हजार रुपये व स्मृतीचिन्ह मिळेल. याव्यतिरिक्त, उत्तेजनार्थ इतर गायकांना देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध संगीत विशारद तय्यब शेख व सौ. प्राजक्ता (सिंधुदुर्ग) करणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 21 फेब्रुवारी पर्यंत पांचपीर चावडी येथील एम.एच. ट्रेडिंग कंपनी व जुना बाजार येथील ए वन येथे नाव नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी सईद खान 7058637121 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.