चर्मकार विकास संघ व सिताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम
मेळाव्यात सहभागी होण्याचे समाजबांधवांना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात रविवारी (दि.15 ऑक्टोबर) चर्मकार समाजाचे निशुल्क राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्यात समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, वधु-वर व पालक परिचय समितीचे अध्यक्ष रामदास सातपुते व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी केले आहे.
सकाळी 11 वाजता वधु-वर व पालक परिचय मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. आमदार संग्राम जगताप व संदीप घनदाट यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
वधू-वर सुचक व पालक परिचय मेळावा हा पूर्णपणे निशुल्क असून, राज्यस्तरावर होणाऱ्या या मेळाव्यासाठी चर्मकार समाज बांधवांनी आपल्या विवाह इच्छुक असलेल्या अविवाहित, घटस्फोटीत, विधुर, विधवा व अपंग वधू-वरांसह रविवारी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्यातून येणाऱ्या समाजबांधवांची भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चर्मकार विकास संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत असून, मेळावा यशस्वी होण्यासाठी चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी, सदस्य, वधु-वर व पालक परिचय समितीचे कार्यकारणी सदस्य व माजी आमदार सिताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकारणी मंडळ परिश्रम घेत आहे.
