लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निलमताई गोऱ्हे महिलांशी साधणार संवाद -अनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात गुरुवारी (दि.22 ऑगस्ट) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दुपारी 2 वाजता होणाऱ्या या मेळाव्यास विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे महिलांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून रोजी जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना 31 ऑगस्ट पर्यन्त अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज भरले त्यांचे रक्षाबंधनापूर्वी 3 हजार रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यात वर्ग झाला आहे. अनेकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर काहींनी अर्ज भरुन देखील पैसे खात्यात वर्ग झालेले नाही. योग्य पध्दतीने अर्ज भरुन विविध त्रुटी दूर करुन त्याची पूर्तता करण्यासंदर्भातही या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यात महिलांना उपस्थित राहण्याचे शिवसेनेच्या वतीने म्हंटले आहे.