केडगावच्या सरस्वती विद्यालयाचा उपक्रम
शालेय शिक्षणाबरोबर मुलांचे आरोग्य महत्त्वाचे -जालिंदर कोतकर
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच सदृढ आरोग्यासाठी ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करुन या ओपन जीमचे लोकार्पण पार पडले.
संस्थेचे अध्यक्ष दादाराव ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. ढवाण म्हणाले की, सर्वात प्रथम मी शिक्षकांचे आभार मानतो. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ होण्यासाठी ते सातत्याने धडपड करत असतात. जे विद्यार्थी शिक्षणात मागे पडत आहे, त्यांच्यासाठी शिक्षक एक तास अगोदर येवून त्यांचे जादा तास घेऊन शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी योगदान देत आहेत. या शिक्षकांच्या योगदानाने शाळेचा 100 टक्के निकाल लागत आहे. पालकांनी देखील मुलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या डब्यात सकस आहार द्यावा. शाळेत विद्यार्थ्यांना ओपन जीमद्वारे व्यायाम करता येणार असून, विद्यार्थ्यांचा बौध्दिक व शारीरिक विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक जालिंदर कोतकर म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबर मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य उत्तम असल्यास विद्यार्थी आपली प्रगती साधू शकतो. गेल्या काही दिवसांपासून शाळेचे मुख्याध्यापक यांनी ओपन जिमची मागणी केली होती. त्या मागणीचा पाठपुरावा माजी खासदार डॉ. सुजय विखे याच्याकडे करण्यात आला होता. त्यांणी तात्काळ याला मंजुरी देवून काम मार्गी लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदीप भोर यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी संस्था समन्वयक डॉ. रवींद्र चोभे, अरुणराव यशवंत कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार, ज्ञानेश्वर अंदुरे, ॲड. प्रज्ञाताई आसनीकर, सुबोध गोहाड, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदींसह शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले. आभार शिवाजी मगर यांनी मानले.