• Fri. Feb 7th, 2025

सिध्दार्थनगर येथील कचरा वेचक कामगारांची ऑनलाईन नोंदणी

ByMirror

Jan 21, 2025

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार

कचरा वेचकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे -अनिल शेकटकर

नगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारकडे महाराष्ट्रातील कचरा वेचक कामगारांचा अधिकृत आकडा नसल्याने ऑल इंडिया कचरा वेचक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ऑनलाईन कचरा वेचकांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कचरा वेचकांना मिळण्याच्या उद्देशाने ही नोंदणी सुरु असून, या पार्श्‍वभूमीवर कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या माध्यमातून शहरातील कचरा वेचकांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
सिध्दार्थनगर येथील कचरा वेचक कामगारांच्या नोंदणी अभियानाचे शुभारंभ माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्या हस्ते झाले. श्रमिक कष्टकरीचे नेते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कामगार नेते बाळासाहेब वडागळे, ऑल इंडिया कचरा वेचक संघटनेचे प्रतिनिधी निखिल, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे, पोपट पाथरे आदींसह सिध्दार्थनगर भागातील कचरा वेचक महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अनिल शेकटकर म्हणाले की, कचरा वेचकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. उपेक्षित घटकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी सुरु असलेली नोंदणी त्यांच्या कल्याणासाठी पडलेले पाऊल आहे. विविध कल्याणकारी योजना तयार असून, लाभार्थींना त्या योजना पदरात पाडून घेता आले पाहिजे. यासाठी सुरु असलेले संघटनेचे कार्य दिशादर्शक आहे. कष्टकऱ्यांच्या संघर्षासाठी नेहमीच पाठबळ राहणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


भाऊसाहेब उडाणशिवे म्हणाले की, कष्ट करून कचरा वेचक उदरनिर्वाह करतात. कुटुंबाचा भार पेळतान एखादे संकट आल्यास आवश्‍यक कागदपत्र नसल्याने शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. कचरा वेचक कामगारांची अधिकृतपणे नोंदणी झाल्यास शासनाला त्यांच्याकडे विशेष योजना राबविता येणार आहे. या कामगारांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम सदर संस्था सेवाभावाने करत आहे. दे रे हरी पलंगावरी…. ही संकल्पना बदलावी लागणार आहे. उपेक्षित राहू नये यासाठी कामगारांनी जागरूक राहून शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


बाळासाहेब वडागळे म्हणाले की, हमाल कष्टकरी वर्गासाठी मागील 40 वर्षापासून कार्य करत आहे. कचरा वेचकांच्या हक्कासाठी देखील पाठबळ देण्याचे काम करणार आहे. वंचित, शोषितांच्या संघर्षात सदैव पुढाकार राहणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. या नोंदणी अभियानाद्वारे सिध्दार्थनगर परिसरातील मोठ्या संख्येने कचरा वेचकांची नोंदणी करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत करुन विकास उडाणशिवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *