• Wed. Oct 29th, 2025

निमगाव वाघाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान गाजले चितपट कुस्त्यांनी

ByMirror

May 4, 2024

नामवंत मल्लांचे रंगल्या कुस्त्या

यात्रा उत्सव व संदल-उरुसनिमित्त गावात धार्मिक एकतेचे दर्शन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि.03 मे) संध्याकाळी झालेल्या कुस्तीचे मैदान लाल मातीच्या आखाड्यातील थरारक कुस्त्यांनी रंगले होते. हलगी-डफाचा निनाद, बजरंग बलीचा जयघोष, आखाड्या भोवती जमलेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात युवा मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. मैदानात झालेल्या चितपट कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मल्लांनी डाव-प्रतिडावाने आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली.


या मैदानात पै. संदिप डोंगरे (निमगाव वाघा) विरुध्द पै. दत्ता जाधव (कोल्हार) व गौरव शिंदे (निमगाव वाघा) विरुध्द सुयोग धामणे (सारोळा कासार) यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. यामध्ये पै. संदिप डोंगरे आणि गौरव शिंदे यांनी कुस्ती चितपट करुन विजय मिळवला. तर मानाची कुस्ती मनोज फुले (वाडियापार्क तालीम) विरुध्द विश्‍वंभर खैरे (जंगले महाराज आश्रम, कोकमठाण) यांच्यात झाली. या कुस्तीमध्ये मनोज फुले विजयी झाले.

ग्रामस्थांच्या वतीने कै. प्रभाकर चौरे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा व 31 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले. इतर विजयी मल्लांना देखील रोख बक्षीसे देण्यात आले. तर इतर दिग्गज मल्लांच्या चितपट कुस्तींनी उपस्थितांची मने जिंकली. वैभव फलके, सोनू डोंगरे, विराज डोंगरे, सोमनाथ आतकर यांच्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या. यावेळी महिला कुस्तीपटूंच्या देखील कुस्त्या लावण्यात आल्या. चितपट कुस्ती होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजयी मल्लास दाद दिली. तर विजयी, उपविजयी मल्लांना रोख बक्षिस देण्यात आले.


यावेळी जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक अरुण फलके, किरण जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र डोंगरे, साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे, अतुल फलके, प्रमोद जाधव, वसंत फलके, बाबा केदार, संजय कापसे, अरुण कापसे, नामदेव भुसारे, मयुर काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस उत्साहात पार पडला. रात्री गावात कव्वालीची मैफल रंगली होती. यात्रा उत्सव व संदल-उरुसनिमित्त गावात धार्मिक एकतेचे दर्शन घडले. ग्रामदैवत वीरभद्र बिरोबा महाराज देवस्थान व करिमशहा वली बाबांच्या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संदल उरुस यशस्वी करण्यासाठी राजू शेख, दिलावर शेख आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *