गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ -प्रा. माणिक विधाते
नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय शिक्षकांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला. तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किटचे वितरण करण्यात आले. सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात हा उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व विशद करण्यात आले.
यावेळी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अभिजित सपकाळ, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे, सचिन चोपडा, बजरंग दरक, जहीर सय्यद, मेजर दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, शिवम भंडारी, सलाबत खान, सर्वेश सपकाळ आदींसह हरदिनचे सदस्यम शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापकांसह शालेय शिक्षक लता म्हस्के, सविता सोनवणे, राधाकिसन क्षीरसागर, योगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, सचिन बर्डे, अमोल मेहत्रे, सारिका गायकवाड, निता जावळे, सविता सोनवणे, मिनाक्षी घोलप यांचा ग्रुपच्या वतीने रोपं देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या किटमध्ये स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, ड्रॉईंग साहित्य यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
संजय सपकाळ म्हणाले की, गुरु म्हणजे जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात आणतो. गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तर मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत, आणि आपल्या आयुष्याचा आधार असतो. गुरुंच्या मार्गदर्शनाने जीवन संपन्न बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ आहे. शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळत असते. फक्त उच्च शिक्षण देऊन विद्यार्थी घडणार नसून, त्याला संस्काराची जोड द्यावी लागणार आहे. प्रत्येकाचे जीवन गुरुंच्या माध्यमातून घडत असते. ते गुरु कोणत्याही रुपात असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाने केलेली वाटचाल यशस्वी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.