• Mon. Jan 26th, 2026

दिवाळीनिमित्त शहरात आनंदाचा शिधा वाटप सुरु

ByMirror

Nov 8, 2023

भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या हस्ते वितरण

सर्वसामान्यांचे हित साधणारे कल्याणकारी सरकार राज्यात सत्तेवर -दत्ता गाडळकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना दिला जाणारा आनंदाचा शिधा वाटप शहरात सुरु करण्यात आले आहे. नागरिकांचा देखील आनंदाचा शिधा घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आनंदाच्या शिधाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.


नगर-कल्याण रोड, दातरंगे मळा येथील स्वस्त धान्य दुकानात भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या हस्ते लाभार्थींना शिधा वाटप करण्यात आले. यावेळी भाजपच्या सरचिटणीस सविता कोटा, प्रा. भगवान काटे, अभय दातरंगे, धान्य दुकानदार संजय सागावकर, रोहिणी कोडम, योगिता ढुमणे आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या महत्त्वकांशी निर्णयाने यावर्षी देखील नागरिकांना दिवाळीचा शिधा दिला जात असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार असल्याची भावना लाभार्थींनी व्यक्त केली. थेट लाभार्थींना शिधाचा लाभ मिळत असल्याने समाधानाचे वातावरण आहे.


दत्ता गाडळकर म्हणाले की, सर्वसामान्यांचे हित साधणारे कल्याणकारी सरकार राज्यात सत्तेवर असून, कल्याणकारी योजनेद्वारे जनसामान्यांचा विकास साधण्यासह दुर्बल घटकांना आधार दिला जात आहे. आनंदाच्या शिधाने सर्वांच्या घरात दिवाळी साजरी होणार आहे.

यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तूंचा समावेश आहे. 100 रुपयांत लाभार्थींना आनंदाचा शिधा मिळणार असून, या किटमध्ये 1 किलो साखर, 1 किलो खाद्यतेल, तसेच रवा, चणाडाळ, पोहे व मैदा या चार वस्तू प्रत्येकी अर्धा किलो देण्यात येत आहेत. सरकारने घेतलेला निर्णय दिलासा देणारा असून, लाभार्थींना शिधा मिळण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *