जिल्ह्यातील पेन्शनर्सना आंदोलनात सहभागी होण्याचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि.7 डिसेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदानावर देशव्यापी निषेध व संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील पेन्शनर्सना सहभागी होण्याचे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय संघर्ष समिती गेली सात वर्षापासून ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा येथे मागील 5 वर्षापासून साखळी उपोषण सुरु आहे. अत्यंत कमी पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा अभावामुळे अनेक ईपीएस 95 धारक जग सोडून जात आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ईपीएस 95 पेन्शनधारकांना महागाईच्या काळात सन्मानाने जगण्यासाठी पेन्शनवाढसह त्यांचे आरोग्याचे प्रश्न व इतर प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी संघटना आग्रही असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
किमान पेन्शनमध्ये 1000 रुपये वरून 7500 रुपये पर्यंत वाढ करावी, सर्व पेन्शनधारकांना कोणताही भेदभाव न करता उच्च निवृत्ती वेतनाची सुविधा द्यावी, मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्या, नॉन ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये द्यावी आदी मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातून जास्तीत जास्त पेन्शनर्स सहभागी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, उपाध्यक्ष एस.के. सय्यद, शहराध्यक्ष संजय मुनोत, उपाध्यक्ष प्रकाश गायके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशाताई शिंदे, नगर तालुकाध्यक्ष अंबादास बेरड, उपाध्यक्ष भिमराज भिसे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंतअप्पा वाळके, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, शिर्डी अध्यक्ष दशरथ पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख आदी प्रयत्नशील आहेत.