• Thu. Mar 13th, 2025

2 जूनला कोरोना महामारीत लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची शहरात बैठक

ByMirror

May 19, 2024

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक रविवार दि. 2 जून रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने बोलविण्यात आली आहे. लूट झालेल्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यासाठी व आजही काही रुग्णांकडे पैश्‍यासाठी तगादा लावणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


कोरोना महामारीने जगभर हैदोस घातला असताना भारतात योग-भज्ञाक तंत्रामुळे अमेरिका, इंग्लंड यांच्यापेक्षा मृत्यांची संख्या फारच कमी होती. कोरोना विरोधात लसीचा वापर झाला. परंतु त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. यापुढे सुद्धा योग-भज्ञाक तंत्रामुळे भारतासह जगभरातील मानव जातीला नक्कीच हमी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


योग-भज्ञाक ही तत्व प्रणाली हजारो वर्षे सिद्ध झाली आहे आणि निसर्गाने दिलेले वरदान या स्वरूपात तमाम लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे. योगा बाबतची भक्ती, योगाचे ज्ञान आणि प्रत्यक्ष योग विद्येचा वापर यातून प्रतिकारशक्ती प्रचंड वाढते. ही बाब भारतीयांना गेली 5 हजार वर्षापासून माहिती आहे. योगाला आयुर्वेदाने साथ दिल्यामुळे कोरोना आटोक्यात येऊ शकला, त्यामुळे भारतासह सर्वच मानव जातीने योग-भज्ञाक तंत्राचा स्वीकार आणि वापर सातत्याने केला पाहिजे असे, आवाहन करण्यात आले आहे.


कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने प्रेत तयार करणारे कारखाने म्हणून चालविले. त्याच वेळेला कोट्यावधी रुपयांचा मलिदा खाल्ला. त्यामुळे डॉक्टरांबाबत समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसीमुळे दुर्गामी दुष्परिणाम होत असल्याबाबत बोलले जाते त्यातून पुन्हा डॉक्टर लोक जनतेची लूट केल्याशिवाय राहणार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


2 जून रोजी दुपारी 3 वाजता हुतात्मा स्मारकात बैठक होणार असून, या बैठकीस कोरोना काळात हॉस्पिटलकडून लूट झालेल्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी ॲड. गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, डॉ. रमाकांत मडकर, जालिंदर बोरुडे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *