जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुर्वण
माध्यमिक शिक्षक सोसायटी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करेल -आप्पासाहेब शिंदे
नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने पै. विराज बाबासाहेब बोडखे याचा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांचे लहान चिरंजीव असलेले पै. विराज बोडखे याने नुकत्याच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व महापालिका क्रीडा विभाग यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात दमदार खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकाविले. या यशामुळे त्याने शहराचे नाव कुस्ती क्षेत्रात उंचावले असून, पुढे विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत विराज नक्कीच चमकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीत झालेल्या कार्यक्रमात चेअरमन आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांनी विराज बोडखे याचा सत्कार केला. यावेळी संचालक सुनील दानवे, उमेश गुंजाळ, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, बालाजी गायकवाड, छबु फुंदे, साहेबराव रक्टे, शिवाजी लवांडे, बाजीराव अनभुले, अतुल कोताडे, विजय पठारे, सुरज घाटविसावे, संचालिका वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, तज्ञ संचालक उद्धव सोनवणे, सचिन जाधव, सचिव स्वप्निल इथापे, ज्ञानेश्वर लबडे, दिपक आमटे, संतोष दहातोंडे, निखील हिरनवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माध्यमातून संचालक व सभासदांच्या पाल्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. आमची सोसायटी ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विराज बोडखे याने सुवर्णपदक मिळवून शहराचे नाव उंचावले आहे. तो उत्कृष्ट कुस्तीपटू असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विभागीय व राज्यस्तरावरही तो निश्चितच यश संपादन करेल. भविष्यात माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांनीही विराजचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व संचालकांनी त्याचे अभिनंदन केले.