वन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन
एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांनी जमवली माया -रघुनाथ आंबेडकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील उप वनसंरक्षक कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण बनले असल्याचा घनाघाती आरोप जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने चौकशी करण्याचे निवेदन त्यांना पाठविण्यात आले आहे.
आंबेडकर म्हणाले की, अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक हे वन विभागाचे मालक बनून मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या विरोधात 30 जून 2025 रोजी नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कार्यालयासमोर संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग व घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. यानंतर मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, उपवनसंरक्षक व संबंधित भ्रष्ट वन अधिकारी यांनी हे आदेश उघडपणे धाब्यावर बसवले.
14 ऑगस्ट 2025 रोजी होणारे उपोषण विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यांनी 15 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र मुदत संपूनही कोणतीही चौकशी न झाल्याने संघटनेने पुन्हा 9 सप्टेंबर रोजी उपोषण पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
आंबेडकर यांनी आरोप केला की, वनपाल, वनरक्षक, वन परीक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक यांची मिलीभगत होऊन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. साध्या वनपालांनीदेखील बंगले, गाड्या, प्लॉट, बँक बॅलन्स, शेती अशा प्रचंड संपत्तीची जमवाजमव केली आहे. दहा-बारा वर्षांपासून काही अधिकारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. चौकशी करून या काळ्या पैशाचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. चौकशी न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाणार आहे. तर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
माथनी गावातील दोन आरोपींनी बिबट्याची निर्घृण हत्या करून त्याचे पंजे व मिशा उपटल्याची घटना 2 जून 2025 रोजी समोर आली. वन परीक्षेत्र अधिकारी (प्रा.) अहिल्यानगर अविनाश तेलोरे यांनी या घटनेबाबत माहिती दिली होती. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपी एका दिवसातच सुटल्याने जनतेत प्रचंड संताप पसरला आहे.
भारताच्या संविधानाने झाडझुडपे, प्राणी-पक्ष्यांनाही संरक्षण दिले आहे. मात्र आज काही भ्रष्ट अधिकारी संविधानाची पायमल्ली करत आहेत. या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर 2025 रोजी उप वनसंरक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे पुन्हा उपोषण व घंटानाद आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, राज्य पदाधिकारी, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांनी भ्रष्टाचारविरोधी या लढ्यात समविचारी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.