बाबासाहेबांनी राज्य घटनेतून समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न साकारले -संजय सपकाळ
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या फुलांच्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले.
भीमनगर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी त्रीशरण, पंचशील व भीमस्तुतीने वंदना करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, युवक अध्यक्ष शिवम भंडारी, सरचिटणीस विशाल (अण्णा) बेलपवार, संपतराव बेरड, दीपक लिपाणे, मच्छिंद्र बेरड, अक्षय नागापुरे, जयभाऊ भिंगारदिवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव, मंगेश मोकळ, जनाभाऊ भिंगारदिवे, अशोक भोसले, गौतम भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे, सदाशिव मांढरे, प्रदीप भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, बाबासाहेबांनी दीन-दलितांच्या उध्दारासाठी कार्य केले. गुलामगिरीत चाचपडलेल्या समाजाला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. राज्यघटनेतून समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न त्यांनी साकारले. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या अंधारात प्रकाशवाट निर्माण करुन त्यांनी न्याय प्रस्थापित केला. तर संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता प्रस्थापित केल्याचे त्यांनी सांगितले.
