दूरसंचार सेवा खंडित; महाराष्ट्र मोबाईल टॉवर संघटनेच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा
मोबाईल टॉवर दुरुस्तीला युद्धपातळीवर मोहीम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचले, विजेचे खांब कोसळले, शेतीचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर अनेक भागांतील मोबाईल टॉवरमध्ये बिघाड झाल्याने दूरसंचार सेवा ठप्प झाली होती. अचानक खंडित झालेल्या या सेवेमुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटून, अडचणींना सामोरे जावे लागले.
अशा वेळी महाराष्ट्र मोबाईल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेने तातडीने पुढाकार घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड आदी ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये युनियनचे सचिव उमाकांत सोनवणे, राहुल पुंड, जिल्हाध्यक्ष रफिक शहा, सुनील महाजन, भरत झेंडे, प्रसाद तरवडे, गणेश वाघ, विजय भापकर, उद्धव काळदाते, सिद्धार्थ थोरात, विजय जराड, सचिन पवार, हरीभाऊ लोखंडे, प्रवीण बडे, योगेश साबळे या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. पाण्यात बुडालेल्या टॉवरसमोरही हार न मानता त्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम हाती घेतले.
अनेक टॉवर अजूनही पाण्यात असले तरी अथक परिश्रम घेऊन काही तासांत सेवा पूर्ववत करण्यात आली. या कामगिरीमुळे दूरसंचार सेवा पुन्हा सुरू झाली असून, नागरिकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कर्मचाऱ्यांनी धोक्याची पर्वा न करता तत्परतेने सेवा दिली.
