कवयित्री सरोज आल्हाट यांची, ‘अनन्यता’ वाचायला घेतलं आणि शेवटची कविता वाचल्यावरच पुस्तक खाली ठेवलं. तुमच्या शब्दात मलाच नाही तर वाचणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्या आईच्या आठवणीत घेऊन जाण्या एवढी ताकद आहे. अर्थात ही ताकद तुमच्या आईनेच तुम्हाला दिली आहे. शब्द ह्रदयातून आले, तरच डोळे पाणावतात. अन्यथा फक्त शब्दांचे खेळ…
मुलं मुली बिनदिक्कत आईच्या जवळ जाऊ शकतात वडिलांच्या नाही, जरी दोघेही तितकेच जवळचे असले तरी. ही मातृ ह्रदयाची ताकद. तुम्ही तर आईच बाळ झालात,आईचं बोट लहानपणी तुमच्या आधारासाठी धरलंत आणि तिच्या मोठेपणी तिला आधारासाठी दिलंत. तेही ती विकलांग, स्मृतीभ्रंशाने त्रासली असताना, लहान बाळा सारखंच तुम्ही सारं केलंत, कर्तव्य म्हणून नाही तर जीव तुटत होता म्हणून. आजच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या वा निराधार अवस्थेत सोडून देण्याच्या काळात, तरुणांच्या डोळ्यात आपण झणझणतीत अंजन घातलं आहे, तेही नकळत, असं करा म्हणून सांगितलं नाही, आई गेल्या नंतर भावनांचा विस्फोट झाला आणि त्या कागदावर उतरल्या एवढेच.म्हणूनच एके ठिकाणी तुम्ही म्हणता,
आई,
अश्रूंचा आक्रोश
माझ्या जिवंतपणाचे पुरावे झाले
गाऱ्हाणे मांडताना आयुष्याचे
तुझे श्वास, माझे झाले….
आई गेल्या नंतरही तुम्ही तिच्या आठवणींनी व्याकुळ होता, आणि म्हणता,
आई,
तुझी रिकामी खाट
हाक मारते रोजच
ये…कुशीत घेते तुला
रडू नकोस माझ्या बाळा….
खरं तर सांग्रहातल्या अशा अनेक कविता देण्याचा मोह होत आहे, पण त्या पुन्हा पुन्हा आपणच वाचून आईच्या आठवणीत रमणं आवडेल. आईच ह्रदय असतंच तस, प्रेयसी साठी आईच काळीज कापून घेऊन घाईत चाललेला प्रियकर वाटेत पडतो, तेव्हाही आईच्या काळजातून शब्द उमटतात, ‘बाळा. लागलं नाही ना कोठे? अशी असते आई.
तुमच्या सेवाभावामुळे तुमची आई कायम तुमच्या जवळ आहे हे नक्की. तरीही
व्हेंटीचाही अबोल थरकाप
कंप सुकल्या ओठी होते
दाटून आला कंठात जीव
काळीज झेलू पहात होते….
या ओळी ह्रदयाचा थरकाप करतात.
आई गेल्या नंतरही आपण निराधार वृद्धांची आई बनून सेवा करता, हे तुमचं प्रेम आई पर्यंत नक्कीच पोहचत असेल..
कितीही लिहिलं तरी कमी पडेल. लिहीत रहा…
ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध लेखक डॉ. सदानंद भणगे यांनी सुप्रसिद्ध कवयित्री सरोज आल्हाट यांच्या ' अनन्यता ' या काव्यसंग्रहाचे केलेले संक्षिप्त विश्लेषण व परीक्षण
