लाभार्थ्यांना गावातच विविध दाखल्यांचे वाटप
भटक्या विमुक्तांना हा दिवस अधिकाराविषयी जागरूक करतो -प्रताप कळसे
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे मंडळ अधिकारी कार्यालय नेप्ती यांच्या वतीने व मा. उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील व तहसीलदार श्री. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी भटक्या-विमुक्त समाजातील लाभार्थ्यांना जातदाखले, उत्पन्न दाखले आदी विविध दाखल्यांचे गावातच वाटप करण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि कार्यालयीन दगदग वाचल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास नेप्ती गावचे सरपंच संजय जपकर, नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार, व्हाईस चेअरमन सादिक पवार, सोसायटीचे संचालक जालिंदर शिंदे, सुरेश कदम, महेंद्र चौगुले, भूषण पवार, सचिन पवार, शरद पवार, दत्तू थोरात, नितीन पवार, नेप्ती मंडळातील ग्राम महसूल अधिकारी विनायक दिक्षे, सुवर्णा रांधवण, दीपक झेंडे, श्रीकृष्ण निमसे, रूपाली म्हस्के, दीपाली विधाते, प्रसाद पवार, नैतिक पवार, रोहित गव्हाणे, विशाल चौगुले, रवी पवार, मानव पवार, सम्राट पवार, धनराज पवार, गणेश कर्पे, उपेंद्र कर्पे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे म्हणाले की, 1871 साली ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्रायब ॲक्ट लागू करून भटक्या समाजावर अन्यायकारी कायदा लादला होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी शासनाने हा कायदा रद्द केला. त्यानंतर दरवर्षी 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस समाजातील लोकांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करून देतो आणि सामाजिक न्यायाचा संदेश देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रामदास फुले म्हणाले की, भटके विमुक्त दिवस साजरा करणे हा एक प्रकारचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या समाजाने स्वातंत्रपूर्व काळापासून देशासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातही या समाजाने स्वराज्यासाठी योगदान दिले. भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी ना. अतुल सावे यांचे आभार मानले.
दाखले मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. गावातच दाखले उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले. पूर्वी यासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागे, परंतु आता गावातच सुविधा मिळाल्याने खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी हा संकल्प या उपक्रमातून साधला गेला.