सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडीवर -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाचे नाव उज्वल केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला.
गावातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या सोहळ्यात ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पै. अनिल डोंगरे, भरत बोडखे, लक्ष्मण चौरे, दत्ता फलके, बबन जाधव, दत्ता लोखंडे, सचिन कापसे, चंद्रकांत जाधव, सुरेश जाधव, अनिल आनंदकर, हरिदास फलके, सचिन जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सुभाष खळदकर, नवनाथ हारदे, भाऊसाहेब फलके, हिराबाई फलके, सोमनाथ खांदवे, रामदास जाधव, भास्कर उधार आदींसह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावणारी अनुष्का हरिदास फलके (79.80%), द्वितीय आलेला सार्थक संदीप कापसे (78.60%), आणि तृतीय क्रमांकाची हर्षदा संतोष शिंदे (76.40%) या तिघांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडी घेत आहे. सातत्याने डोंगरे संस्थेच्या वतीने गुणवंतांच सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीनंतर आपले ध्येय स्पष्ट ठेऊन त्या दिशेने विचारपूर्वक वाटचाल करावी. स्वत:चे सामर्थ्य व आवड ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गावातील पालकांनीही डोंगरे संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षणासोबतच कला, क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप संस्थेच्या वतीने दिली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.