छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी समाजकार्यासाठी पुढे यावे -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सोसायटीचे उपाध्यक्ष जालिंदर आतकर, शंकर निकम, संताराम जाधव, अंकुश आतकर, रामदास खोमणे, नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे हे उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व पटवून देत युवकांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या इतिहासातील अमर शूरवीर योध्दे होते. त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेतून आजच्या तरुणांनी बोध घ्यावा. समाजातील अन्याय, अज्ञान, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता यांसारख्या प्रश्नांविरोधात युवकांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर चातुर्य, शिस्त, प्रशासन आणि लोकसहभागाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य उभं केलं. आज अशाच नेतृत्वगुणांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.