• Tue. Oct 14th, 2025

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नवनिर्वाचित सीईओ पल्लवी विजयवंशी यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे सत्कार

ByMirror

Oct 8, 2025

भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कच्या विकासात्मक गोष्टींवर चर्चा


नागरिकांच्या सोयीसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी व विकासात्मक कामांसाठी नेहमीच सहकार्य राहणार -पल्लवी विजयवंशी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेल्या पल्लवी विजयवंशी यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आले. हरदिन मॉर्निंग ग्रुप व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून भिंगार मधील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कला अद्यावत सुविधा निर्माण करणे व इतर प्रश्‍न सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.


मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी नागरिकांच्या सोयीसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी व विकासात्मक कामांसाठी प्रशासनाकडून नेहमीच सहकार्य मिळेल असे आश्‍वासन दिले. त्यांनी हरदिन ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत म्हटले की, नागरिकांचा सक्रीय सहभाग हीच खरी विकासात्मक बदलाची प्रक्रिया आहे.अशा सकारात्मक उपक्रमांमुळे परिसराचा विकास आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


या प्रसंगी प्रांजली सर्वेश सपकाळ आणि सुनिता रमेशराव वराडे यांनी सीईओ पल्लवी विजयवंशी यांचा सत्कार केला. छावणी परिषद कार्यालयात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेशराव वराडे, सचिनशेठ चोपडा, सर्वेश सपकाळ, अभिजीत सपकाळ, जैद सय्यद, मेजर दिलीप ठोकळ, रतनशेठ मेहेत्रे, मनोहर दरवडे, अशोक पराते, अविनाश जाधव, विठ्ठल (नाना) राहिंज, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, दिपकराव धाडगे, ईवान सपकाळ, दशरथराव मुंडे, प्रकाश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.


संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी मागील 25 वर्षांपासून सुरु असलेल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दररोज सकाळी व्यायाम, योगाभ्यास आणि आरोग्यविषयक सत्रांद्वारे आमचा ग्रुप नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचवत आहे. तर वृक्षारोपणाने पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरु आहे. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क हे आता सर्वांसाठी दुसरे घर बनले असून, सर्व सदस्य या उद्यानाची मनापासून काळजी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सचिन चोपडा यांनीही हरदिन ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख करत म्हणाले की, आरोग्य चळवळीबरोबरच सर्व सदस्य सामाजिक जबाबदारीने कार्य करत असून, गरजू घटकांना मदतीचा हात देत आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या सहकार्याने उद्यान अधिक सुंदर, हिरवागार आणि सुसज्ज बनविण्यासाठी सर्व कटिबद्ध असल्याचे सांगितले.


या सत्कार सोहळ्यात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या कार्याचा समावेश असलेली स्मरणिका सीईओ पल्लवी विजयवंशी यांना भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेशराव वराडे यांनी केले, तर आभार सर्वेश सपकाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *