• Sun. Jan 4th, 2026

नवीन वर्षाची सुरुवात सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने

ByMirror

Jan 1, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान


सार्वजनिक स्वच्छतेतूनच आरोग्यदायी समाज घडणार -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची प्रभावी चळवळ उभी करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने केले. शहरालगत असलेल्या ऐतिहासिक चांदबीबी महाल परिसरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासोबतच परिसरात पूर्वी लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्षसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला.


या स्वच्छता अभियानात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये अशोकराव दळवी, राजू शेख, कलीम शेख, संजय भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, सुधीर कपाळे, दिलीप गुगळे, विलास आहेर, अशोक पराते, दीपक मेहतानी, अविनाश जाधव, दीपक घोडके, अविनाश पोतदार, मुन्ना वाघस्कर, सईद खान, अब्दुल रशीद, शेषराव पालवे, प्रकाश देवळालीकर, रामनाथ गर्जे, विनायक कुलकर्णी, विजयाताई कुलकर्णी, हनिफभाई, किरण फुलारी, मुक्तार शेख, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, प्रा. सलाबाद खान, भरत कनोजिया, दिलीपराव बोंदर्डे, सिताराम परदेशी आदी सदस्यांचा सहभाग होता.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ सातत्याने राबविण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी योग-प्राणायामाचे नियमित उपक्रम घेतले जात असून, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर दिला जात आहे. उत्तम आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध ठिकाणी स्वच्छतेचे उपक्रम राबविले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.


नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती निर्माण झाल्यास विविध आजारांवर व रोगराईवर निश्‍चितच नियंत्रण मिळविता येईल, असा विश्‍वासही संजय सपकाळ यांनी व्यक्त केला. तसेच ग्रुपच्या वतीने यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचे नियमित संवर्धनाचे काम सुरू असून, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले.


या अभियानादरम्यान हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी चांदबीबी महाल परिसरात पसरलेल्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल्स तसेच इतर मोठ्या प्रमाणातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिलेला हा स्वच्छतेचा संदेश नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण करणारा ठरेल असा विश्‍वास ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *