अध्यक्षपदी जाकीर सय्यद, सचिवपदी अतिक शेख व खजिनदारपदी युनूस शेख यांची नियुक्ती
उर्दू शिक्षकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील -जाकीर सय्यद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक असोसिएशनच्या नुकतेच झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनची बैठक श्रीरामपूर येथील खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल येथे पार पडली. यावेळी जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते जाकीर सय्यद (श्रीरामपूर) यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच जमीर शेख (अहिल्यानगर) व राजमहोमंद पठाण (शिर्डी) यांची उपाध्यक्षपदी, अतिकशेख (कोल्हार) यांची सचिवपदी, फारुख सांगलिकर यांची उपसचिवपदी, तर युनूस शेख (जामखेड) यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचा कार्यकाळ 2025 ते 2028 असा तीन वर्षांचा राहणार आहे.
निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना जाकीर सय्यद म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजातील उर्दू हायस्कूलमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटना ठामपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.