गरजू विद्यार्थ्यांसाठी भाई सथ्था नाईट हायस्कूलला उपलब्ध करुन दिल्या वह्या
अहमदनगर (प्रतिनिधी)-हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील माजी विद्यार्थी असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी नाईट हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांची भेट दिली. सदर वह्यांचा संच नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनिल सुसरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी पप्पू पाटील, विकी तिवारी, विशाल म्हस्के आदींसह इतर मित्र परिवार व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
आनंद लहामगे म्हणाले की, रात्र शाळा मोठे स्वप्न पाहणाऱ्या होतकरु युवकांना दिशा देण्याचे काम करत आहे. त्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. यापुढे देखील रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची मदत उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्राचार्य सुनिल सुसरे म्हणाले की, बिकट परिस्थितीतून नाईट हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आपले भवितव्य घडवत आहे. शाळेतील अनेक माजी विद्यार्थी परिस्थितीची जाणीव ठेऊन रात्र शाळेला हातभार लावत आहे. लहामगे यांचे राजकीय व सामाजिक कार्य प्रेरणादायी असून, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेली मदत स्फुर्ती देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.