आमदार जगताप यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जाणार -आनंद लहामगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, पप्पू पाटील, परितोष वाघुलकर, समीर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
आनंद लहामगे म्हणाले की, प्रशासनाने महापालिका कर्मचारी यांची तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी शासन स्तरावर आमदार जगताप यांचा पाठपुरावा सुरु आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
महागाईच्या काळात महापालिका कर्मचारी यांना सातवा वेतन देणे हा त्यांचा हक्क असून, यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.