वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 91.84 टक्के लागला. शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम- श्रावणी दिलीप जाधव (87 टक्के), द्वितीय- सुप्रिया भरत वाबळे (84.80 टक्के), तृतीय- प्रणाली कोंडीभाऊ फलके (84.20 टक्के) या विद्यार्थ्यांनी येण्याचा बहुमान पटकाविला.
शाळेची सेमी इंग्रजीची ही पहिलीच बॅच असून, त्यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तमप्रकारे यश संपादन केले आहे. गुणवंत व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, अध्यापक व शिक्षकेतरांचे माजी आमदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालकांनी अभिनंदन केले.
शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी (दि.9 जून) सत्कार करण्यात येणार आहे.
