कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान; महिला मेळाव्याचेही आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
हा सन्मान सोहळा नवरात्रातील सातव्या माळेला, म्हणजेच रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यावेळी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, समाजातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग, पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव 25 सप्टेंबर 2025 पर्यंत पै. नाना किसन डोंगरे, अध्यक्ष, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा, ता. नगर, जि. अहिल्यानगर 414005 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे यांच्याशी 9226735346 / 8605775261 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.