• Fri. Mar 13th, 2026

महिला दिनानिमित्त रविवारी ‘नैसर्गिक सौंदर्य व निरोगी जीवन’ मार्गदर्शन शिबिर

ByMirror

Mar 13, 2026

गुडघे-सांधे विकार, नॅचरोपॅथी आणि नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन


प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा महिलांसाठी मोफत; लाभ घेण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी नैसर्गिक आरोग्य आणि सौंदर्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 15 मार्च रोजी शहरात हा कार्यक्रम होणार असून गुडघे व सांधे विकार, नॅचरोपॅथी व शरीर शुद्धी तसेच नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांची माहिती अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


दूधगंगा पशुखाद्य केंद्र, शिवाजी महाराज पुतळ्यासमोर, मार्केटयार्ड येथे दुपारी 3 ते 6 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात व्याख्यान, प्रात्यक्षिके तसेच उपस्थित महिलांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांसाठी मोफत नॅचरोपॅथी सरबताची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिराचा मोठ्या संख्येने महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हेमा सेलोत व हेमांगीनी पोतनीस यांनी केले आहे.


कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पुण्याचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. विश्‍वजीत चव्हाण गुडघे व सांधे विकारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सूक्ष्म व्यायाम, योगिक व्यायाम आणि योग्य आहार पद्धतीच्या माध्यमातून सांधेदुखी व गुडघेदुखीपासून मुक्ती कशी मिळवता येते, तसेच सांध्यांचे आरोग्य कसे टिकवून ठेवावे याचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर विश्‍लेषण ते करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात डॉ. हेमांगिनी पोतनीस नॅचरोपॅथीच्या माध्यमातून शरीर निरोगी ठेवण्याबाबत मार्गदर्शन करतील. नैसर्गिक पदार्थांचा वापर करून शरीरातील विषारी द्रव्ये कशी बाहेर टाकावी, शरीर शुद्धीची प्रक्रिया कशी करावी याबाबत त्या माहिती देणार आहेत. याचबरोबर ‘सहज योग षडचक्र ध्यान’ या द्वारे शरीर शुद्धी व रोगमुक्ती याविषयीही मार्गदर्शन केले जाणार आहे.
तिसऱ्या सत्रात नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. घरच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांपासून 2मी.मध्ये मेकअप लिपस्टिक, फेस पॅक आणि लिपबाम कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन हेमा सेलोत व ऐश्‍वर्या शहा (देवी) यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे.


या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार आपुलकी अकॅडमी फाउंडेशन, बॉलर्स अकॅडमी तसेच योगतज्ज्ञ अनिल मेहर, मनोज राजापुरे, डॉ. पद्माकर रासवे, गणेश तनपुरे, मयूर कांगणे, डॉ. शैलेजा घुले, ज्योती कानडे, शारदा डे, शुक्ला मुथा, दीप्ती गांधी, रिद्धी चंदे, ऐश्‍वर्या देवी, राखी गांधी, जयश्री तनपुरे, भारती दौलतनी, साक्षी मेहतानी, ऋतुजा गिते, दीपशिका कराचीवाला, शिल्पा बालवे, सपना गुगळे, दीपिका भारदे आदी आरोग्यवर्धिनीच्या सर्व विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *