शाळा वेळेतील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका -इंजि. केतन क्षीरसागर
शहर वाहतूक शाखेला निवेदन; विद्यार्थ्यांची वाहनात कोंबून होणारी वाहतुक थांबवा
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात शाळा सुटताना आणि भरताना होणारी वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संबंधी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद सागरे यांना निवेदन दिले.
वाहतुकीचे विस्कटलेले नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रमाणापेक्षा कोंबून विविध वाहनातून होणारी वाहतुक आणि शाळा सुटताना चौका-चौकात होणारी वाहतुक कोंडी संदर्भात इंजि. केतन क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी दिपक वाघ, ऋषीकेश जगताप, किरण घुले, राजू मकासरे, कृष्णा शेळके, मंगेश शिंदे, अरबाज शेख, ओमकार मिसाळ, रोहित सरना, शिवम कराळे, गौरव हरबा, स्वप्निल कांबळे आदी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. शाळा भरताना आणि शाळा सुटताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शाळेच्या रिक्षा, बस व अन्य ट्रान्सपोर्ट वाहतुकीचे कोणतेच नियम पाळत नाही. शहरातील काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू असताना ठरावीक मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत आहे. नियमांची पायमल्ली होत असताना अनेक लहान-मोठे अपघाताची मालिका सुरु होण्यापूर्वी त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
शाळेला येताना व घरी जाताना नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचतील असे प्रसंग उद्भवत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिकांना देखील मार्ग मिळू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे एखादा अपघात झाल्यास एखाद्याला जीवाला मुकावे लागेल अशी परिस्थिती उद्भवत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात विद्यार्थ्यांची वाहतुक करणारे स्कूलबस, रिक्षा यांच्यासाठी असलेल्या आवश्यक कागदपत्र तपासण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा प्रसंग उद्भवल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांना घेऊन वाहतुक करणाऱ्यांना नियम पाळण्यासाठी सक्तीची कारवाई करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संबंधी वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.