आरोपींना तात्काळ अटक करा, पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी
राज्याचे गृहमंत्री अकार्यक्षम; दलितांवरील अत्याचाराची परिसीमा ओलांडली -पंडित कांबळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथील संजय नितीन वैरागर या मातंग समाजातील युवकावर झालेल्या अमानुष हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात वैरागर यांना गंभीर दुखापत झाली असून, आरोपींना तात्काळ अटक करावी व पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाने प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, संघटक सचिव अशोक बागुल, सामाजिक कार्यकर्ते विकास उडाणशिवे, महिला विभाग शहराध्यक्ष नलिनी गायकवाड, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अथार खान, वैद्यकीय विभाग शहराध्यक्ष प्रशांत दरेकर, सोफियान रंगरेज, रोहन शेलार, अल्तमश जरीवाला, प्रमोद आढाव, सचिन नवगीरे आदी उपस्थित होते.
संजय वैरागर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले असून, त्यांच्या एका डोळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय अंगावरून टू-व्हीलर आणि फोर-व्हीलर वाहने घालण्यात आल्याने त्यांचे दोन्ही पाय मोडले आहेत. वैरागर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिष्टमंडळाने रुग्णालयात भेट देऊन जखमी वैरागर व त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.
प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे म्हणाले की, सोनई येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. राज्यातील महायुती सरकारच्या काळात जातीयवादी शक्तींचे मनोबल वाढले असून, मागासवर्गीय समाजाला योजनाबद्धपणे लक्ष्य केले जात आहे.
सदर युवकावर यापूर्वीही चार ते पाच महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता. मात्र पोलिस प्रशासनाने ती दखल घेतली नाही. त्याचेच परिणाम आज दिसत आहेत. दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, राज्याचे अकार्यक्षम गृहमंत्र्यांमुळे दलितांवरील अत्याचाराची परिसीमा ओलांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा तत्काळ राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली.
सोनईतील जातीयवादी गावगुंडांवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करावी, तसेच वैरागर कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
