• Mon. Jan 26th, 2026

राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीचा डोंगरी जंगलपेर आणि भीम-हनुमान बंधाऱ्यासाठी पुढाकार

ByMirror

Apr 22, 2024

गर्भगिरीच्या डोंगररांगात जंगलपेरीचा प्रस्ताव

साध्या पध्दतीने विवाह लावून जंगलपेर करण्याचे आवाहन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण आणि वन्य प्राण्यांचा प्रश्‍न जनतेच्या सहकार्याने सोडविण्यासाठी राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून डोंगरी जंगलपेर आणि भीम-हनुमान बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. ड्रोनच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगात येथील सुमारे 500 चौरस किलोमीटर परिसरात डोंगरी जंगलपेरीचा प्रस्ताव राज्य सरकार समोर ठेवण्यात आल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


राज्य सरकारची काम करण्याची पद्धत लक्षात घेता, युद्ध पातळीवर डोंगरी जंगलपेर सरकार हाती घेऊ शकणार नाही. यासाठी राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात डोंगरी जंगलपेर विवाह पद्धती अमलात आनली जाणार आहे. विवाहातून वंश चालविणे गृहीत धरले जाते, परंतु पर्यावरण त्यातील झाडे-वेली आणि वन्य प्राणी यांचा वंश मानवाच्या लोभीपणामुळे धोक्यात आला आहे. तर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे होणारे विवाह जंगल परिसरात साध्या पद्धतीने करण्यात यावे. वधू-वरांच्या डोक्यावर ड्रोनच्या माध्यमातून पहिल्यांदा अक्षता ऐवजी बिया उधळून त्याच वेळेला जंगलाच्या इतर सर्व भागात ड्रोनच्या माध्यमातून रानटी बियांची पेरणी करण्याचा प्रस्ताव आहे. ड्रोन मार्फत होणाऱ्या जंगलपेरीचा खर्च लग्नाच्या खर्चात बचत करून करण्यात यावा व साध्या पद्धतीने लग्न साजरे व्हावे यासाठी संघटनेचा प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


वन खात्याने त्यांचे डाक बंगले अशा विवाहांसाठी मोफत उपलब्ध करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विवाहाचा मोठा खर्च वाचवून ड्रोनच्या माध्यमातून होणाऱ्या डोंगरी जंगलपेरीसाठी किमान 1 ते 2 लाख रुपये नवरा-नवरीच्या आई-वडिलांनी संयुक्तरीत्या खर्च करावेत, अशी संघटनेची आग्रही भूमिका आहे. अशा लग्नांमध्ये झुणका भाकर असे वनभोजन करण्यात यावे, की ज्यामुळे जंगलपेरसाठी पैसे उपलब्ध होऊ शकतात. राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीच्या पुढाकाराने लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी प्रत्येक शहरात आणि गावोगावी राष्ट्रीय लोकभज्ञाक केंद्रांची स्थापना करता येणार आहे. साध्या पद्धतीने विवाह करण्याचे नव्या जोडप्यांना आग्रह करण्यात येणार आहे.


गेल्या दहा वर्षात पाण्याचा प्रश्‍न बिकट बनला असताना जंगल आणि डोंगरी भागात वन्य प्राणी पाण्याअभावी मरत आहे. पाणी व अन्नासाठी ते मानवी वस्तीकडे वळत आहे. नवरा नवरीच्या आई-वडिलांनी एखादा तरी भीम-हनुमान बंधारा जंगल परिसरात बांधून द्यावा किंवा खर्चाची रक्कम द्यावी. यासाठी संघटनेचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हंटले आहे.


सरकार आणि वनमंत्र्यांच्या सहकार्याशिवाय डोंगरी जंगलपेर आणि भीम-हनुमान बंधारा योजना राबविणे संघटनेला अवघड आहे. त्यामुळे समाजाने देखील या कामी सहकार्य करावे आणि सरकारवर दबाव निर्माण करावा असे संघटनेचे प्रयत्न आहे. या अभियानासाठी ॲड. कारभारी गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, प्रकाश थोरात, अशोक भोसले आदी राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *