• Tue. Jul 22nd, 2025

उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवस साजरा

ByMirror

Nov 9, 2023

कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

कॅन्सर बरा होण्यासाठी योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्‍यक -डॉ. संतोष गिऱ्हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवस साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व चुकीची आहार पध्दतीमुळे झपाट्याने वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली.


प्रारंभी धन्वंतरी पूजन करुन जनजागृती कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शहरातील संजीवनी आर्थो स्पाईन हॉलिस्ट सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, विनोद साळवे, रावसाहेब काळे, ॲड. महेश शिंदे, तनिज शेख, पोपट बनकर, धीरज ससाणे, सचिव वैशाली कुलकर्णी, सदाशिव निकम आदी उपस्थित होते.


डॉ. संतोष गिऱ्हे म्हणाले की, कॅन्सरने घाबरण्याची गरज नसून, योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्‍यक आहे. कॅन्सर प्रथम अवस्थेत तपासल्यास रुग्ण बरे होतात. मात्र भीतीपोटी लोक तपासण्या करत नसल्याने मृत्यूकडे ओढले जातात. हा आजार संसर्गजन्य नसून, लाईफस्टाईलमुळे निर्माण होणारा आजार आहे. अनुवंशिकतेनुसारही काही प्रमाणात रुग्ण आढळतात. सध्या लठ्ठपणामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे. शरीराला आवश्‍यक अन्न घटकाची कमतरतेने देखील कॅन्सर होत असल्याचे स्पष्ट केले. तर कॅन्सरला न घाबरता लढा देऊन त्यावर मात करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाद्वारे वाढते कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तर फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव पातळीवर कॅन्सरची जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *