अहमदनगर (प्रतिनिधी)- चेन्नई येथे होणाऱ्या 15 व 17 वर्ष आतील मुले-मुली यांच्या आखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा बॅडमिंटन संघ सहभागी होणार आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी अहमदनगर जिल्ह्यामधून प्रथमच बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मल्हार कुलकर्णी यांची नियुक्ती महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ 19 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. या संघात 15 वर्ष आतील खेळाडू गाथा सूर्यवंशी (इंडिया नंबर 2), प्रांजल शिंदे (इंडिया नंबर 2), यश्वी पटेल (इंडिया नंबर 7) व 17 वर्ष आतील खेळाडू देव रुपरेलिया (इंडिया नंबर 4), नाईशा भाटोये (इंडिया नंबर 7) यांची निवड झाली आहे.
मल्हार कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप व अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. माणिक विधाते, जिल्हा असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, खजिनदार राहुल मोटे, शहर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष भूषण अनभुले, अशोक सोनीमंडलेचा, अजय भोयर, शालेय राज्य बॅडमिंटनचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे आदी उपस्थित होते.
