• Tue. Jan 20th, 2026

सोमवारी न्यू आर्टस महाविद्यालयात रंगणार ‘नगारा संगीत महोत्सव – 2026’

ByMirror

Jan 17, 2026

पं. नागेश आडगावकर, पं.डॉ. राम देशपांडे व गंधार देशपांडे या दिग्गज कलाकारांचे शास्त्रीय गायन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने शहरात दि.19 व 20 जानेवारी रोजी ‘नगारा संगीत महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.


प्रतीवर्षी आयोजित करण्यात येणारा व केवळ महाविद्यालयाच्याच नव्हे तर संपूर्ण अहिल्यनगर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा महोत्सव म्हणून ‘नगारा संगीत महोत्सवाचे’ नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मागील सहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर या वर्षी 7 व्या ‘नगारा संगीत महोत्सवाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.


सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी सायं.6.00 वाजता महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर स्व.उस्ताद राशिद खां यांचे पट्टशिष्य सुप्रसिद्ध गायक पं. नागेश आडगावकर यांची शास्त्रीय व सुगम गायनाची मैफल होणार आहे. त्यांना संवादिनीवर स्वानंद कुलकर्णी, तबल्यावर रोहन पंढरपूरकर, व्हायोलिनवर संजुक्ता फुकान, पखवाजवर रोहित खवळे व स्वरसाथ प्रफुल्ल सोनकांबळे हे साथसंगत करणार आहेत.


मंगळवार, दि. 20 जानेवारी रोजी सायं. 6.00 वाजता सुप्रसिद्ध गायक पं. डॉ. राम देशपांडे व त्यांचे सुपुत्र व पट्टशिष्य, सुप्रसिद्ध गायक श्री. गंधार देशपांडे यांचा गुरुशिष्य परंपरा अंतर्गत ‘सहगायन’ हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना संवादिनीवर मकरंद खरवंडीकर, तबल्यावर प्रशांत गाजरे व पखवाजवर सौरभ साठे हे साथसंगत करणार आहेत. याप्रसंगी संस्थेचे सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्व कार्यक्रम महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे होणार आहेत.


तसेच, दि. 19 जानेवारी रोजी राज्यस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा महाविद्यालयातील राजर्षी शाहू सभागृह येथे व राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धा (वैयक्तिक) राजमाता जिजाऊ सेमिनार हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सायं. 5 वाजता संस्थेच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.


हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमासाठी सर्व नगरकर संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे व संगीत विभागप्रमुख प्रा. आदेश चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *