निमगाव वाघात लाल मातीच्या आखाड्यात रंगला कुस्त्यांचा थरार
विविध वजन गटांतून दहा कुस्तीपटूंची निवड; सासवड येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ‘महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2025-26’ या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी शहर व जिल्हा संघ निवड चाचणी मोठ्या उत्साहात पार पडली. बिरोबा मंदिरासमोरील लाल मातीच्या पारंपरिक आखाड्यात झालेल्या या निवड चाचणीत मल्लांच्या दमदार डावपेचांमुळे कुस्त्यांचा थरार रंगला होता.
स्पर्धेच्या प्रारंभी आखाड्याचे पूजन करून निवड चाचणीचे उद्घाटन भानुदास ठोकळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पै. बाळू भापकर, पै. संदिप डोंगरे, पोपट शिंदे, विकास निकम, नामदेव भुसारे, संदेश जाधव यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, नगर जिल्ह्याला दिग्गज मल्लांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक तरुण मल्ल लाल मातीच्या आखाड्यात सराव करून उत्कृष्ट कुस्ती करत आहेत. मात्र आधुनिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी मल्लांनी मॅटवरील कुस्तीवरही लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. कुस्ती या खेळात राजकारण करण्यापेक्षा खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने दि. 12 ते 15 मार्च दरम्यान सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे मातीवरील वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ‘महाराष्ट्र केसरी’ आयोजित करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा संघाची निवड करण्यासाठी निमगाव वाघा येथे ही निवड चाचणी घेण्यात आली.
या निवड चाचणीत 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 किलो तसेच महाराष्ट्र केसरी गटासाठी 85 ते 140 किलो वजन गटांमध्ये सामने पार पडले. जिल्ह्यातील सुमारे 170 खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग नोंदविला होता. प्रत्येक वजन गटात खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्यांना चित्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. प्रेक्षकांनीही मल्लांच्या प्रत्येक डावावर टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत विविध वजन गटांतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 खेळाडूंची वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेला हा संघ सासवड येथे होणाऱ्या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा संघटनेचे राज्य सचिव मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेचे पंच म्हणून संदिप डोंगरे व पोपट शिंदे यांनी काम पाहिले. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे निवड चाचणी यशस्वीपणे पार पडली.
