भारतीय संगीतामध्ये आत्मिकशुद्धतेचीही क्षमता -कल्याण मुरकुटे
विद्यार्थ्यांनी सादर केले विविध रागाचे सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- भारतीय संगीत जगातील सर्वश्रेष्ठ संगीत आहे. या संगीतामध्ये आत्मिकशुद्धतेचीही क्षमता आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये सन 2019 मध्ये म्युझिकल अकॅडमीची स्थापना झाली. ती अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहे. ही अकॅडमी विद्यार्थ्यांना केवल अभिजात शास्त्रीय संगीतचे सखोल आणि शिस्तबद्ध शिक्षण देत नाही, तर त्यांच्या वादन कलेत आणि आत्मिक शुद्धतेतही भर घालत असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम संगीत शिक्षक कल्याण मुरकुटे यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये विशेष संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीत शिक्षक मुरकुटे हे बोलत होते. विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीत विभाग प्रमुख परशुराम मुळे यांनी प्रास्तावित केले. पाहुण्यांचा परिचय कु. राजनंदिनी जाधव हिने करून दिला.
भारतीय संगीत ऐकल्याने आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन प्रसन्न होते. भारतीय संगीत व पाश्चात्त्य संगीत यामधील फरक कल्याण मुरकुटे यांनी प्रत्यक्ष आपल्या गायनातून मुलांना करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील रागाबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थी कौशिक नातू, आरोही अनारसे, श्रुतिका दरेकर, गौरव भुकन यांनी अनुक्रमे राग बागेश्री, राग काफी, केदार, पुरिया धनश्री यांचे सादरीकरण अतिशय सुंदर रित्या करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी हार्मोनियमवर साथ परशुराम मुळे तर तबल्याची साथ विकास साबळे, तानपुरा साथ प्राची पवार, व श्रेया पांडव यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प. रामचंद्र महाराज दरेकर, लक्ष्मण महाराज शास्त्री, संतोष दाणे, पवन नाईक, राम शिंदे, संतोष कुलट, शैला शिवगुंडे, विद्यालयाचे उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब व्हावळ, कल्पना पाठक, वैभव कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षरा फुलसौंदर हिने केले. आभार अध्यापिका शितल डिंमळे यांनी मानले.