कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंना यश मिळते -आ. शिवाजी कर्डिले
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंना यश मिळते. शहराला कुस्तीचा मोठा वारसा असून, पै. विराज बोडखे यांनी शालेय जीवनात कुस्तीमध्ये मिळवलेले यश अभिनंदनीय आहे. नवोदित खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाणार असल्याची भावना आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल पै. विराज बाबासाहेब बोडखे याचा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, अनिल आंधळे, सोमनाथ वामन, संजय शिरसाठ, मयूर कराळे आदी उपस्थित होते.
पुढे आमदार कर्डिले म्हणाले की, खेळ ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची गोष्ट नसून, ती माणसाच्या आयुष्याला शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण देते. आपल्या ग्रामीण भागातून असे खेळाडू पुढे येत आहेत. विराज बोडखे विभागीय स्पर्धेतही असेच चमकदार प्रदर्शन करेल अशी अपेक्षा व्यक्त करुन त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
पै. विराज बोडखे हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांचा लहान मुलगा आहे. तो भिस्तबाग येथील छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्रात पै. शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वस्ताद पै. संदीप गायकवाड, पै. नितीन आव्हाड, पै. आतीष ठाकूर, पै. शंभू यादव यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत आहेत. तो सावेडी येथील आनंद विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.