जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड
पै. विराज बोडखेने मिळवलेले यश शहराचे नाव उज्वल करणारे -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कुस्ती हा आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला खेळ असून, नगरच्या अनेक मल्लांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. विराज बोडखेने मिळवलेले हे यश शहराचे नाव उज्वल करणारे असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल पै. विराज बाबासाहेब बोडखे याचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, माजी नगरसेवक सुनिल गव्हाळे, अजय साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, शहर व उपनगरातील खेळाडूंना आवश्यक ते पाठबळ व प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. आजच्या पिढीतील युवकांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता क्रीडा व संस्कारांना प्राधान्य दिले पाहिजे. कुस्ती या खेळाला अधिक चालना मिळावी म्हणून शहरात यापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली होती. भविष्यात आणखी मोठ्या पातळीवरील स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. शहरातील प्रत्येक खेळाडूस आवश्यक सुविधा, मैदान आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरु असल्याचे ते म्हणाले.
बाबासाहेब बोडखे यांनी स्व.अरुणकाका जगताप यांच्या प्रेरणेने पै. विराज हा कुस्ती केंद्रात दाखल झाला होता. आमदार संग्राम जगताप यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे स्पष्ट केले. पै. विराज बोडखे हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांचा लहान मुलगा असून तो भिस्तबाग येथील छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्रात पै. शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वस्ताद पै. संदीप गायकवाड, पै. नितीन आव्हाड, पै. आतीष ठाकूर व पै. शंभू यादव यांच्याकडून कुस्तीचे धडे घेत आहे. तो सध्या सावेडी येथील आनंद विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.