उपोषणात भ्रष्ट पोलिसांच्या तक्रारींचा पाऊस!
स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार लंके यांचे उपोषण सुरू
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी सोमवारपासून (दि.22 जुलै) पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही असा इशारा देत उपोषणात भ्रष्टाचाराची मडकी फोडली.
तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार लंके म्हणाले की, आमच्याकडे आज लेखी स्वरूपात मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. नगर जिल्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडया सर्रास सोडल्या जातात. अनेक ट्रकचालकांना लुटले जाते.

श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजिविका बंद केली. पोलीसांची धटींगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाही. पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गुल आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी केली त्यावेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले. ही धक्कादायक माहीती उजेडात आली त्यावेळी पोलीस अधिक्षक तसेच गुन्हे शाखेची चलाखी उजेडात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी, त्यांच्याकडील अतिरिक्त कराभार काढून घेण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा खासदार लंके यांनी यावेळी दिला.
प्रारंभी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते टॉपअप पेट्रोल पंम्प येथून मोर्चाने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर दाखल झाले. या उपोषणात अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, किरण काळे, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, प्रकाश पोटे, बाबाजी तरटे, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, ॲड. राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, चंद्रभान ठुबे, प्रा. संजय लाकूडझोडे, ज्ञानदेव लंके यांच्यासह महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला. तर उपस्थितांनी आपल्या भाषणात पोलीसांच्या जाचाचा पाढा वाचला.

खासदार लंके यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी मंगळवारी नगर लोकसभा मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यांसमोर उपोषण करण्याचा इशारा महाविकास आघाडी तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
आंदोनल दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो
हे आंदोलन दडपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन वाईट कृत्य केले जाउ शकते. पोलीस बळाचा वापर करू शकतात. त्यातून खोटे गुन्हे दाखल करण्याचाही प्रयत्न होईल त्यामुळे संपूर्ण आंदोलनादरम्यान माध्यम प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी व्हिडीओ रेकॉडींग करण्याचे आवाहन खा. नीलेश लंके यांनी यावेळी केला.
सुवर्णकारांना जाच
एका गुन्हयातील मुद्देमाल दहावेळा वसुल केला जातो. सुवर्णकारांना अनधिकृत लॉक अप मध्ये बसवून दहशत निर्माण केली जाते. पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कॉल ट्रॅकिंग करतात. त्यामुळे या विभागाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे. अनिल राठोड यांच्यानंतर खा. नीलेश लंके यांनी सुवर्णकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे.
-लाळगे, अध्यक्ष सुवर्णकार संघटना