• Wed. Nov 5th, 2025

क्रांती दिनानिमित्त निमगाव वाघा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ByMirror

Aug 9, 2025

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ग्रामस्थांमध्ये आरोग्य जागृती

नगर (प्रतिनिधी)- क्रांती दिनाच्या निमित्ताने निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, कै. रेश्‍माबाई नेमीचंद जैन (पुणे) संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवनाथ मंदिराच्या सभामंडपात पार पडलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, डॉ. एस. बी. मुजावर, डॉ. एम. शेख, डॉ. श्‍वेता मिश्रा, भानुदास कापसे, अर्चना काळे, द्रोपदा कापसे, कल्पना काळे, बेबीताई कदम, मृणाल कापसे, रावसाहेब केदार, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, एकता फाऊंडेशनचे अतुल फलके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


सुयश हेल्थ केअरच्या माध्यमातून महिलांसह सर्व ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. डिजीटल मशीनच्या साहाय्याने रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन, वजन, बीएमआय अशा विविध चाचण्या अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आल्या. तसेच तज्ज्ञ डॉक्टर्सनी निरोगी आरोग्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.


सरपंच उज्वलाताई कापसे म्हणाल्या की, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपल्याकडे वेळ आणि साधने असूनही आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन होत राहणे गरजेचे आहे. आरोग्य तपासणीमुळे आजारांची लवकर ओळख होते आणि उपचार लवकर सुरू करता येतात. या शिबिरासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था, डॉक्टर्स यांचे त्यांनी आभार मानले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, क्रांती दिन आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या त्यागाची आठवण करून देतो. त्या लढाईत त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा केली नाही, तसेच आपणही आपल्या गावासाठी आणि समाजासाठी कार्य करणे आवश्‍यक आहे. आरोग्य तपासणी शिबिर हा त्याच भावनेतून आयोजित केलेला सामाजिक उपक्रम आहे. आजच्या तरुण पिढीने केवळ स्वतःच्या नव्हे तर संपूर्ण गावाच्या आरोग्याबाबत जागरूक रहावे. पुढेही अशा सेवा कार्यात आपण सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *