दृष्टीदोष असलेल्यांचे अंधकारमय जीवन आनंदऋषीजी नेत्रालयाने केले प्रकाशमय -रवींद्र भंडारी
711 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी; ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्यांचे अंधकारमय जीवन आनंदऋषीजी नेत्रालय प्रकाशमान करत आहे. दुर्बल घटकांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून आधार देत असताना, सर्व आरोग्य सुविधा एका छताखाली देण्याचा दिशादर्शक उपक्रम सुरु आहे. दर्जेदार, सर्वसुविधांनीयुक्त आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना आरोग्यसेवा मिळत आहे. निरोगी समाजासाठी हॉस्पिटलने घेतलेला ध्यास व त्यासाठी सुरु असलेली निस्वार्थ रुग्णसेवा कौतुकास्पद असल्याची भावना रवींद्र भंडारी यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त स्व. सिद्धार्थ रवींद्र भंडारी, स्व. सुमनबाई भंडारी व स्व. किशोरलाल भंडारी यांच्या स्मरणार्थ भंडारी परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रवींद्र भंडारी बोलत होते. याप्रसंगी सचिन भंडारी, श्वेता भंडारी, साधनाताई भंडारी, गिरीश शिंगवी, डॉ. लौकिक भंडारी, संतोष बोथरा, सतीश (बाबुशेठ) लोढा, डॉ. आशिष भंडारी, वसंत चोपडा, नेत्रतज्ञ डॉ. अशोक महाडिक, डॉ. संदीप राणे, डॉ. प्रतिक कटारिया आदींसह नेत्रालयाचे सर्व डॉक्टर उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात भंडारी परिवार सातत्याने योगदान देत आहे. शिबिराबरोबरच इतर उपक्रमात देखील त्यांचा हातभार लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर समाजाची गरज ओळखून आनंदऋषीजी नेत्रालय विभाग 7 वर्षापूर्वी कार्यान्वीत करण्यात आले. ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने हे मिशन म्हणून कार्य करण्यात आले. ग्रामीण भागातील नेत्रदोष असलेले शेतकरी कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटलला आणून त्यांच्यावर मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना एक महिन्याचे औषध देऊन पुन्हा घरा पर्यंत सोडण्याचे काम करण्यात आले. या कार्यासाठी जिल्ह्यात 18 व्हिजन सेंटर कार्यान्वीत असून, प्रदीर्घ अनुभव असलेले नेत्रतज्ञ डॉक्टर या सेवेत जोडले गेले आहे. ग्रामीण भागातील ज्येष्ठांचे पालकत्व घेऊन ही सेवा दिला जात आहे. 17 ऑगस्ट पासून तारकपूर येथे आनंदऋषीजी हॉस्पिटलची शाखा सुरु करत असल्याची त्यांनी माहिती दिली.
सचिन भंडारी म्हणाले की, जगण्याचा आनंद घेण्यासाठी दृष्टी खूप महत्त्वाची आहे. अंधारलेले जीवन प्रकाशमय करुन त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्याचे काम आनंदऋषीजी नेत्रालय करत आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून खर्चिक आरोग्यसेवा गोर-गरीबांना घेणे सहज शक्य झाले असल्याचे सांगितले.
डॉ. संदीप राणे यांनी मोठ्या शहराच्या धर्तीवर नेत्र विकारावर अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध असून, तज्ञ डॉक्टर मंडळी आनंदऋषीजी नेत्रालयात सेवा देत आहे. 1 लाख 4 हजार पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करुन रुग्णांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले आहे. ग्रामीण भागात दृष्टीदोष असलेल्यांना ही सेवा आधार बनली असल्याची त्यांनी माहिती दिली. या शिबिरात 711 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार सतीश (बाबुशेठ) लोढा यांनी मानले.
