375 नागरिकांची मोफत तपासणी, गरजूंना मोफत चष्मे व औषधे वाटप
आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक -आबिद हुसेन
नगर (प्रतिनिधी)- 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान व थोरात सुपर स्पेशलिटी आय केअरच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 375 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
माणिक चौक येथील चाँद सुलताना हायस्कूल मध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आबिद हुसेन यांच्या हस्ते झाले. यावेळी मतीन खान, तन्वीर सय्यद, सद्दाम शेख, रिजवान शेख, मतीन शेख, शब्बीर खान, सईद खान, अल्ताफ लकडावाला, दिलावर शेख, अझहर काजी, अय्युब शेख, तन्वीर बागबान, मुबीन शेख, गनी राज, अकबर पैलवान आदी उपस्थित होते.
आबिद हुसेन म्हणाले की, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोकांकडे वेळ नसतो, तर काहींकडे आर्थिक अडचणींमुळे तपासणी होत नाही. अशा परिस्थितीत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आधार ठरत आहे.
डॉ. प्रीती थोरात यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. शिबिरात ओळखल्या गेलेल्या मोतीबिंदू आणि काचबिंदू रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक गरजूंना मोफत चष्मे व औषधे वितरित करण्यात आली. या शिबिरासाठी हाजी जावेद, अहमद जावेद, संजय भिंगारदिवे, निलेश महाजन, निलेश खरपूडे, मोईज आबेदिन, हाजी जावेद कुरेशी, हाजी नजीर कॉन्ट्रॅक्टर, असीर पठाण यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी थोरात सुपर स्पेशालिटी आय केअरच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.