ग्रामीण भागातील काव्य संमेलन सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा देणारे ठरणार -आ. लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनात आमदार लंके यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रज्ञावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी आमदार लंके यांना स्वागत अध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले. यावेळी किरण लंके, सागर जाधव, ॲड. अमोल थोरवे, सतीश तांदळे, शिवा पाटील होळकर, प्रियंका जाधव, शोभाताई लंके, हवालदार आदी उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 14 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन रंगणार आहे. तर विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार व राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरणाच्या प्रश्नांचा जागर केला जाणार आहे.
आमदार निलेश लंके यांनी ग्रामीण भागात साहित्य क्षेत्राला चालना देण्याचे व नवोदित कवींना संधी देण्याचे काम डोंगरे संस्थेच्या वतीने सुरु आहे. हे काव्य संमेलन सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, आमदार निलेश लंके यांचे राजकारणासह सातत्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात कार्य सुरु आहे. सामाजिक कार्य करणाऱ्यांसह ते साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देत असून, या साहित्य व सामाजिक चळवळीतील सक्रीय योगदानाबद्दल त्यांची स्वागत अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले.